गेली अडीच वर्षे कोरोनाचे जे गुऱ्हाळ सुरु आहे त्यात कोणाचे किती चिपाड झाले आहे याची कल्पना समाजातील ७० टक्के लोकांना नाही. ज्याच्या हाताचे काम अन तोंडचा घास पळवला गेला त्यानेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे दाहक अनुभव सहन केले आहेत. ज्यांनी या काळात समाज सेवेचा आव न आणता आपल्या शेजारी काय चालले आहे याकडे लक्ष दिले त्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे मात्र शेजाऱ्याला मरणयातना सहन करायला सोडून जे जगाचे कल्याण करायला निघाले त्यांनी संकटात असलेले आणि त्यातून कमालीचे नैराश्य आलेले अनेक लोक गमावले आहेत.
मध्यमवर्गीय व्यक्ती कोणत्याही जाती, धर्मातील असो, तिने आपल्या पुरता स्वाभिमान जपलेला असतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शक्यतो कुणाला त्रास होऊ नये किंवा त्यांच्यापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये याची काळजी हा मध्यमवर्गीय व्यक्ती घेत असतो.पोटात भुकेचे कावळे ओरडत असताना श्रीमंत शेजाऱ्याने या जेवायला अशी हाक मारली तरी “अमृत जेवा…”ही भाषा त्यांच्या जिभेवर कायम वसलेली असते. अशा व्यक्ती घरात प्रसंगी उपाशी दिवस काढतील पण कुणापुढे पदर पसरणार नाहीत,अशावेळी शेजारी म्हणून आपल्याला त्यांच्या घरात आणि हृदयातही डोकावता यायला हवे.
कोरोनाने केवळ नोकरी,व्यवसाय हिसकावून घेतले नाहीत तर जगण्याच्या उमेदी देखील हिसकावून घेतल्या आहेत. ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष कोरोनात बळी गेले त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार आता कुठे सुरू झाले आहेत. कुणी गेला तर आपण काही काळ त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा आव आणीत असतो प्रत्यक्षात दुःखात सामील होण्याची कुणाची इच्छा नसते. ज्याच्या घरी आपण बसायला जातो त्याचवेळी उद्या पासून हा मदत तर मागणे सुरू करणार नाही ना हा विचार त्याचवेळी आपल्या डोक्यात सुरू असतो. आतून आपण मोठे क्रूर असतो वरून मात्र सज्जनतेचा आव आणण्यात आपली सगळी ताकद खर्च होत असते.
कोरोनाची देणगी असलेल्या लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाने टोकाच्या नैराश्यात जाऊन परवा विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या आईची हत्त्या करून नंतर आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश मनोहर फडतरे या ४२ वर्षाच्या इंजिनिअर तरुणाच्या आयुष्यात गेली दोन वर्षे हे काय घडत होते याकडे डोकावून बघण्याची त्याच्या शेजाऱ्याला सुध्दा गरज वाटू नये एवढे माणूस म्हणून आपण कोरडे बनलो आहोत. केवळ आपण आत्महत्या करून भागणार नाही. ७२ वर्षाची विविध आजारांनी पछाडलेल्या आईचे आपण गेल्यावर काय होईल याच्या कल्पनेने कदाचित त्याचा थरकाप उडाला असेल, त्याची भीती आणि नैराश्य एवढे प्रबळ झाले की त्याने आधी आईला आणि नंतर स्वतःला संपवून या जगाचा निरोप घेतला.
कुणीतरी मेल्यावर हळहळ व्यक्त करणे हा आता उपचार झाला आहे. यंत्रणा सरकारी असो की कौटुंबिक सगळे कसे निगरगट्ट सुरू आहे. माणूस मेल्यावर रडणारी आणि माणुसकी मेल्यावर स्वतःवर तरंग सुद्धा उमटू न देणारी सध्याची व्यवस्था आपण सर्वांनीच गाठीशी ठेवली आहे,तिचे पालन पोषण करण्याचे काम होतेय. नैराश्य अंतिम टोक गाठते तेव्हा हे जग नकोसे वाटते. आपल्या भवताल, घरात, नात्यात, कॉलनीत अश्या व्यक्ती असतात, त्याचे संकेतही वेळोवेळी मिळत असतात पण चलता है… असे समजून आपण दुर्लक्ष करतो. त्या एका निर्णायक क्षणी कदाचित कुणाची तरी धीर देणारी थाप पाठीवर पडली तर असे जीव वाचू शकतात. ही निर्णायक संधी तुम्ही का घेत नाही?