मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावे मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन खणखणला आणि एकाच तारांबळ उडाली. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे अशी माहिती बोगस फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यानंतर मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोध घेत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली. त्यावेळी तो कॉल फेक असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरू झाला आणि एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विसंगत गोष्टी
या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यलयातील तो वरिष्ठ अधिकारी बुचकळ्यात पडला. आवाज सेम टू सेम. आलेला नंबर ही बरोबर आहे. तरीही त्याला शंका येत होती. शरद पवार साहेब स्वतः बदल्याबाबत फोन करत नाहीत. त्याचप्रमाणे ते थेट फोन करणार नाहीत. तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे समोरच्या व्यक्तीने मी सिल्व्हर ओक येथून बोलतोय अस सांगितलं होतं. या तीन गोष्टी विसंगत होत्या.
मग हे सर्व खात्री करून घ्यायच ठरलं. एक अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून शरद पवार साहेब यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकण्यात आला. त्यावर पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर मात्र, शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून तो व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा प्रयत्नात असल्याचं उघड झाल. मात्र, हा सर्व प्रकार खोटा होता. फसवणूक करणारा होता. यामुळे मग याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्रालयात कॉल आल्यानंतर या कॉलची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. पडताळणीनंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार पोलीस शिपायाने गावदेवी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे या खोट्या कॉलच्या प्रकरणात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.
या फोनच्या प्रकरणात खंडणीविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाज काढत कॉल केला होता, या संदर्भात पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत हा फोन करण्यात आला होता, याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.