Top Newsराजकारण

शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज; राहुल गांधी, शरद पवार संतप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला घाम फोडला. मात्र, सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे, अधूनमधून शेतकरी आक्रमक होत आहेत. हरियाणात शेतकरी थोडसे आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर निष्ठूरपणे लाठीचार्ज केला. त्यामध्ये, अनेक शेतकरी जमखी झाले आहेत. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार शरद पवार यांनी ट्विट करुन हरियाणा सरकार आणि पोलिसांप्रती आपला संताप व्यक्त केला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारीच भाजपच्या या बैठकीला आपला विरोध असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त लावला होता. बॅरिकेड्सदेखील लावण्यात आले होते. मात्र, असे असतानाही बस्तारा टोल प्लाझावर मोठ्या संख्येने शेतकरी जमून निदर्शन करत होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळ आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर हे शेतकरी महामार्गावरही जाऊन बसले. यानंतर पोलीस आणि शेतकरी टोल प्लाझावर आमने सामने आले आणि नंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

हरियाणात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. त्यावेळी, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. आता या घटनेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन या घटनेचा निषेध नोंदवल्यानंतर आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही ट्विट करुन घटनेचा निषेध केला आहे. ‘फिर ख़ून बहाया है किसान का, शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का!’, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

हरियाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकऱ्यांवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आहे. येथील शेतकर्‍यांनी शांततेत सरकारचा विरोध केला. तरीही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी जखमी शेतकऱ्याचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेले उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी आले होते. त्यावेळी विरोध दर्शवण्यासाठी बसताडा टोल नाक्यावर शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. शेतकरी जागेवरुन न हटल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये, शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button