मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाने आता वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोपही केला जातोय. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर, तसंच बहीण यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लटकवू, जाळून टाकू, मारुन टाकू, अशा शब्दात आम्हाला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.
त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत. आमच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आमच्याकडे कोणी पाहत असले तरी भीती वाटते. फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं.
वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं त्यांनी सांगितलं.
तथ्यहीन आरोप केले जात आहे. ट्विटरवर कुणी काहीही लिहू शकतं. उद्या मी लिहिन. तर त्याचा अर्थ तो खरा आहे असं नाही. गावाचं, वानखेडे कुटुंबाचं सर्टिफिकेट पाहा कास्ट सर्टिफिकेट अख्ख्या गावाचं कसं खोटं असेल? रिसर्च जरा नीट करा. उद्यापासून मी बोलणार नाही, ही शेवटची पत्रकार परिषद आहे. सारखं सांगून कंटाळा आलाय. माझा नवरा खोटा नाही. आरोप कोर्टात नाहीत तर ट्विटरवर आहेत. आरोप कोर्टात सिद्ध झाले तर ते गुन्हेगार ठरतील. मीडिया ट्रायलमध्ये गुन्हेगार कसं सिद्ध होईल? 15 वर्षे क्लिन रेकॉर्ड असलेले अधिकारी आहेत. आमची कोट्यवधींची संपत्ती नाही. कोर्टात जाण्याइतके पैसे नाहीत. नाकातोंडात पाणी गेलं तर कोर्टात जाऊ, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी व्यक्त केली आहे.
मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे…
नवाब मलिक यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी कोर्टात जावं. माध्यमांसमोर येऊन असे चुकीचे आरोप करणं योग्य नाही. अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. ही चाळीतली भांडणं आहे. १५ वर्ष ज्या माणसानं नोकरी केली त्याच्यावर एकही डाग नाही. अचानक आज उठून आरोप केले जातात. निनावी पत्रावर कुणाचं नाव नाही. छातीठोकपणे पुढे येऊन आरोप करावेत. आजच्या महिला पुढारलेल्या आहेत परंतु नवाब मलिक बायकांच्या चोमडेपणासारखे आरोप करतायेत अशा शब्दात समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी टोला लगावला आहे.
तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा. नवाब मलिकांच्या मागे ड्रग्ज पॅडलर्सची मोठी लॉबी असू शकते. जर त्यांच्याकडे माहिती असेल पुरावे असतील तर कोर्टात जावं, मीडिया ट्रायल करून काय साध्य करायचं आहे. बिनबुडाचे आरोप करुन बदनाम करण्याचं काम नवाब मलिकांनी केले. बायकाही असं वागत नाहीत. किचनमधला चोमडेपणा. किचन पॉलिटिक्स. मालदिव्समध्ये कोण बॉलिवूड सेलिब्रिटी होते, ते सांगा असंही क्रांती रेडकर म्हणाल्या.
जावयाला अटक केल्यानेच थयथयाट : यास्मिन वानखेडे यांचा हल्ला
समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते असून त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच ते थयथयाट करत असल्याचा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.
नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.
मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का? असा सवालही त्यांनी केला.
समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यापाठोपाठ यास्मिन यांनीही त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. रोज धमक्या येत आहेत. त्यामुळे घरात भीतीचं वातावरण आहे. आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला धमक्या आणि जीवे मारण्याचे फोन येत आहे. कापण्याचे कॉल येत आहेत. मला वाटतं आता आम्हीही रोज खोटे पुरावे देऊन पीसी घ्यायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. धमक्या येत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे या सर्व प्रकरणातून बाहेर पडतील. सत्यमेव जयते होईलच. ते बाहेर पडतील. नेहमीच सत्याचा विजय होतो. तो होईलच, असंही त्या म्हणाल्या.
मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे तीन शब्दांत प्रत्युत्तर
वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मलिक यांनी त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप लावले. याशिवाय बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपदेखील केला. या आरोपांना वानखेडेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. मलिकांना मिळालेले पत्र ‘विनोदी आणि खोटं’ असल्याचं वानखेडेंनी म्हटलं आहे. त्या पत्रातला आशय खोटा आहे. मलिक यांना हवं ते करू दे, असं वानखेडे म्हणाले. ‘हे सगळं विनोदी आणि खोटं आहे. त्यांना केलेले आरोप खोटे आहेत,’ अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली.