‘बाटा’च्या सीईओपदी गुंजन शाह
नवी दिल्ली: ‘बाटा इंडिया’ अग्रगण्य चप्पल कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे माजी मुख्य व्यावसायिक अधिकारी गुंजन शाह यांची नियुक्ती केलीय. संदीप कटारिया यांच्याऐवजी बाटा कंपनीचे सीईओ म्हणून गुंजन शाह पदभार स्वीकारणार आहेत. तर संदीप कटारिया यांना पदोन्नती देत बाटा ब्रँड्सचे जागतिक सीईओ म्हणून नियुक्त केलंय.
शाह हे जून २०२१ मध्ये पदभार स्वीकारतील, असे बाटा इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ते गुरुग्राममधून काम करतील. संदीप कटारिया म्हणाले, जागतिक दृष्टिकोनातून आमच्यासाठी भारत नेहमीच महत्त्वाची बाजारपेठी राहिलीय. गुंजन यांच्यासारखा एक हुशार व्यक्ती कंपनीतील भारतातील कारभाराची जबाबदारी सांभाळेल. बाटा ब्रँड्सला ते स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर आणखी मोठ्या उंचीवर नेतील, असा विश्वास असल्याचंही ते म्हणालेत.
बाटा इंडिया दरवर्षी ४७ मिलियन जोड्या चप्पला विकतात. बाटा इंडिया हा भारतातील सर्वात मोठा फुटवेअर विक्रेता आहे, जो बाटा, हश पिप्पीज, नॅच्युरलाइजर, पॉवर, मेरी क्लेअर, वेनब्रेनर, नॉर्थ स्टार सारख्या ब्रँडची विक्री करतो. देशभरात यामध्ये १६०० हून अधिक किरकोळ स्टोअर्स आहेत. बाटा हा एक स्विस ब्रँड आहे आणि जगभरातील ७० देशांमध्ये तो कार्यरत आहे. महसूलच्या आधारे बाटासाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.