हेमामालिनीच्या गालासारखे रस्त्याचे विधान गुलाबराव पाटलांना भोवणार?, रुपाली चाकणकरांचा इशारा
जळगाव : राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका प्रचारसभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर खडसे यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर देताना मतदारसंघात काम केलं म्हणूनच ४० वर्ष निवडून येतोय असं म्हटलं आहे.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
गेली ३० वर्ष ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्त करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत”, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानाचा आता निषेध व्यक्त केला जात आहे.
दरेकरांनी केली कारवाईची मागणी
गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारं एक ट्विट केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखरच चुकीचं विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसांत विसंवाद सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपाला पसंती देईल, असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.