अर्थ-उद्योगफोकस

सर्वात मोठा बँक घोटाळा; गुजरातमधील कंपनीकडून २८ बँकांना २२,८४२ कोटींचा चुना !

नवी दिल्ली : बँकिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील २८ बँकांच्या कंसोर्टियमसह २२,८४२ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेला हा बँकिंग फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गुन्हा आहे. दरम्यान, एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत.

ऋषी कमलेश अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवी विमल नेवेटिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेने ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिली तक्रार दाखल केली होती. यावर सीबीआयने १२ मार्च २०२० रोजी काही स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर बँकेने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली. जवळपास दीड वर्ष तपास केल्यानंतर सीबीआयने तक्रारीवर कारवाई करत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार नोंदवली.

कंपनीने २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जवळपास २,४६८.५१ कोटी रुपयांचे एक्सपोजर आहे. फॉरेन्सिंग ऑडिटमध्ये असे उघड झाले आहे की, २०१२-१७ दरम्यान, आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने निधी वळवणे, अनियमितता आणि गुन्हेगारी विश्वास भंग यांसारख्या बेकायदेशीर कृत्ये केली. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, बँकांनी ज्या उद्देशासाठी निधी जारी केला होता, त्याऐवजी तो अन्य काही कारणांसाठी वापरण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button