मेलबोर्न : फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीद्वारा ही दु:खद बातमी मिळाली. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना एका पत्रकाद्वारे माहिती देताना, वॉर्नचे थायलंडमधील समुई येथे निधन झाल्याचे सांगितले.
व्यवस्थापन कंपनीने आपल्या माहिती पत्रकामध्ये म्हटले की, ‘शेन आपल्या व्हिलामध्ये बेशुद्ध आढळून आले. वैद्यकीय टीमच्या पूर्ण प्रयत्नानंतरही त्यांचा जीव वाचविण्यात यश आले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी या क्षणी शांत राहण्याचे आवाहन केले असून, योग्यवेळी पूर्ण माहिती देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर केवळ वॉर्नने एक हजारहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
वॉर्नने भारताविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १९९२ ते २००७ दरम्यान त्याने क्रिकेटविश्वावर आपला प्रभाव पाडला. या जोरावर विस्डेनने शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये वॉर्नचीही निवड केली होती. २०१३ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये वॉर्नचा समावेश झाला होता. १९९९ च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या यशात वॉर्नची कामगिरी निर्णायक ठरली होती.
शेन वॉर्न पहिला आयपीएल विजेता कर्णधार आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघात फारसे स्टार खेळाडू नव्हते. वॉर्नच्या रूपाने त्यांच्याकडे जागतिक चेहरा होता. संघाची धुराही त्याच्याकडेच देण्यात आली होती. कर्णधार म्हणून वॉर्नने संघात स्टार खेळाडू नसल्याचे कोणतेही दडपण न घेता युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेतली. त्याने शेन वॉटसनच्या अष्टपैलू खेळाचा कल्पकतेने वापर केला. आपल्या कल्पक आणि आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर वॉर्नने पहिला आयपीएल विजेता कर्णधार होण्याचा मान मिळवला.
शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी २००७ मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
नियतीपुढे सारेच हतबल…
शेन वॉर्नने क्रिकेटपटू रॉडनी मार्शच्या निधनावर काही तासांआधीच शोक व्यक्त केला होता. ते आमच्या महान खेळातील अर्ध्वयू होते शिवाय युवा खेळाडूंसाठी प्रेरणा होते, ट्विट वॉर्नने केले. पण या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
सचिन तेंडुलकर भावूक
शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याचा मैदानातील प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र सचिन तेंडुलकरने दुःख व्यक्त केलं आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला की, तुझी आठवण येईल. भारत आणि भारतीयांसाठी तुझ्या हृदयात विशेष स्थान होते. सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, धक्कादायक, स्तब्ध आणि दुःखी…, आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी, जेव्हा तू मैदानात किंवा मैदानाबाहेरही असायचास तेव्हा कधीच कोणताही क्षण कंटाळवाणा वाटायचा नाही. मैदानावरील आपली स्पर्धा आणि मैदानाबाहेरचे आपले विनोद मला नेहमीच आठवतील. तुझ्या मनात भारतासाठी नेहमीच खास स्थान होते आणि भारतीयांनी तुला त्यांच्या हृदयात स्थान दिले आहे.
अनकेदा वादाच्या भोवऱ्यात
शेन वॉर्न हा दिग्गज फिरकीपटू असला तरी अनेकदा तो वादात अडकला. शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही वादाचे प्रसंग देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरले. शेन वॉर्न आणि मार्क वॉ यांच्यावर बुकींशी संपर्क केल्याचा आरोप झाला होता. १९९४ च्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय बुकींना खेळपट्टीची माहिती आणि वेदर कंडिशन पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वात खेळत असताना १९९९ मध्ये वेस्ट इंडिज विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात वगळ्यात आलं होतं. २०१६ मध्ये शेन वॉर्ननं स्टीव्ह वॉ हा स्वार्थी खेळाडू असल्याचा आरोप २०१६ मध्ये केला होता. शेन वॉर्न यानं ब्रिटीश नर्स सोबत असभ्य भाषेत संवाद सादला होता. शेन वॉर्न सातत्यानं मेसेज करत असल्याचा दावा त्या नर्सनं केला होता. यानंतर शेन वॉर्नला उपकप्तानपद गमवावं लागलेल. शेन वॉर्न आणखी एका ब्रिटिश महिलेशी संबंधित प्रकरणामुळं वादग्रस्त ठरला होता.
शेन वॉर्न यानं २००८ मध्ये सिगारेटपासून मुक्ती देण्यासाठी पर्याय असलेल्या निकोरेटची जाहिरात घेतली होती. मात्र, २००८ मध्ये सिगारेट ओढतानाचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. २००३ मध्ये प्रतिबंधित औषधे घेतल्यानं वॉर्नला कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.
शेन वॉर्नच्या सगळ्या प्रकरणांना कंटाळून त्याच्या पत्नीनं त्यच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये त्याची पत्नी त्याचापासून वेगळी झाली. यानंतर ब्रिटीश अभिनेत्री लिझ हर्ली याच्यासोबत देखील शेन वॉर्नचे संबंध होते. दोघांची एंगेजमेंट देखील झाली होती. लिझ हर्ली २०११ मध्ये वॉर्नच्या मेलबर्नच्या घरात राहायला गेली आणि २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर दोनच वर्षात गोष्टी चिघळल्या आणि २०१३ मध्ये ते वेगळे झाले. शेन वॉर्न यानं सप्टेंबर २०१७ मध्ये वेलेरी फॉक्सचा विनयभंग केल्याचं प्रकरण देखील गाजलं होतं