गेटचा निकाल जाहीर; एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र
मुंबई : इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया ‘गेट’चा (Graduate Aptitude Test) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा यंदा आयआयटी मुंबईने आयोजित केली होती. ही परीक्षा ६ व ७ आणि १३ व १४ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये पार पडली होती. या परीक्षेला सुमारे सात लाख ११ हजार ५४२ विद्यार्थी बसले होते. यापैकी १७.८२ टक्के म्हणजे अवघे एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
पात्र उमेदवारांमध्ये ९८ हजार ७३२ मुले, तर २८ हजार ८१ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा २७ विषयांची घेण्यात आली होती. यामध्ये यंदा पर्यावरण इंजिनीअरिंग आणि ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस या दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ३० मार्च ते २० जून या कालावधीत https://appsgate.iitb.ac.in/ या लिंकवर जाऊन डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेनंतर प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीष चौधरी यांनी अभिनंदन केले.