Top Newsराजकारण

विधानसभा अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेला राज्यपालांचा आक्षेप, ठाकरे सरकारसमोर पेच

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका : नाना पटोले

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असतानाच ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार राज्यपालांनी आपला अभिप्राय कळवला असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.

राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता. पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे.

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका : नाना पटोले

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान, जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे, ते सगळं काही आम्ही करु, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिक असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल.

जे नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सर्व कार्यवाही केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती देखील नाना पटोले यांनी यावेळी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button