एअर इंडियाबाबत तूर्त कोणताही निर्णय नाही : पीयूष गोयल
नवी दिल्ली : एअर इंडियासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, एअर इंडियाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच, एअर इंडियाच्या बोलीतील विजेत्याची निवड निश्चित प्रक्रियेद्वारे केली जाईल.
पीयूष गोयल सध्या दुबई एक्स्पोमध्ये भाग घेण्यासाठी दुबईत आहेत. येथील पत्रकारांशी पीयूष गोयल यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी कालपासून दुबईमध्ये आहे आणि माझ्या मते असा कोणताही निर्णय (एअर इंडियासंदर्भात) सरकारने घेतला नाही. साहजिकच यासाठी निविदा मागवण्यात आल्या आणि आमचे अधिकारी त्याचे मूल्यांकन करत आहेत. याची एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यानंतर एअर इंडिया बोलीच्या विजेत्याचे नाव योग्य वेळी जाहीर केले जाईल.
दरम्यान, सरकारी कंपनी एअर इंडियाची खरेदी टाटा करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केल्याची माहिती समोर आली होती. तसेच, नागरी उड्डाण मंत्रालय, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी टाटा समूहाचे प्रतिनिधी आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर सरकारने मीडिया अहवालात समोर आलेल्या या वृत्ताचे खंडन केले होते.
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार टाटा सन्सने एअर इंडियावर लावण्यात आलेली बोली जिंकल्याचे समोर आले होते, मात्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाची देखरेख करणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटने हे वृत्त फेटाळले होते. डीआयपीएएम विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी शुक्रवारीच एअर इंडिया संदर्भातील अहवाल फेटाळला होता. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारने कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.
अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती. सरकारने एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसेच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचे पत्र दिले होते.