नवी दिल्ली : देशभरात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये उंट, हत्ती, घोडे, तबला, कबूतर, सॅक्सोफोन आदींचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य दिसून येणार आहे. गुगलच्या डुडलमध्ये एक हत्ती, एक घोडा, एक कुत्रा, एक उंट, तबला, संचलन मार्ग, आयकॉनिक कॅमल-माउंटेड बँडचा भाग म्हणून सॅक्सोफोन, कबूतर आणि राष्ट्रध्वज दर्शवणारा तिरंगा रंगाचा समावेश करण्यात आला आहे.
सकाळी १०.०५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर १०.१५ वाजता पंतप्रधान राजपथवर पोहोचतील. त्यानंतर १०.१८ वाजता राष्ट्रपती राजपथवर पोहोचतील. राष्ट्रपतींच्या घोडेस्वार अंगरक्षकांसह राजपथवर दाखल होतील. सकाळी १०.२६ वाजता ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत होईल. यावेळी २१ तोफांची सलामी दिली जाईल.
परेडचे सेकंड इन कमांड मेजर जनरल आलोक कक्कर यांच्या आगमनानंतर परेडची विधिवत सुरुवात होईल. या वर्षीपासून परेड सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी १० वाजता सुरू व्हायची. मात्र, हवामानामुळे परेड अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील.