मोदींमुळे भारताचे स्वातंत्र्य हिरावले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल
वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणा-या फ्रीडम हाऊसने स्वातंत्र्यांसंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये कपात केली आहे़ भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे. नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचे फ्रीडम हाऊसने म्हटले आहे. खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने कोरोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचे फ्रीडम हाऊसने नमूद केले आहे.
स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे. फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणा-या संस्थावर दबाव टाकला. वेगवेगळ्या विषयांचे जणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणा-या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणा-या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले, असे नमूद करण्यात आले आहे.