मुंबई : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यात कोरोनावरील बहुतांश निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे, राज्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यात मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, या क्षेत्राशी संबंधितांना नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षांपासून राज्यातील प्रार्थनास्थळे आणि सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा नेते आणि अध्यात्मिक आघाडी, वारकरी संघटना आग्रही आहे. तर, दुसरीकडे सिनेमागृहे बंद असल्याने कलाकार, तमाशा कलावंत आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांचीही मोठी अडचण होत आहे. त्यामुळे, आता सिनेदिग्दर्शक, अभिनेते, कलाकार आणि सिनेक्षेत्राशी संबंधित इतर मंडळीही रोष व्यक्त करत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवरुन आपली नाराजी उघड केली होती. त्यानंतर, आता दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीही आपला रोष व्यक्त केला आहे.
अभिजीत पानसे यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही !, असा टोला पानसे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. त्यामुळे, राज्य सरकार याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न आहे.
प्रशांत दामलेंचा उपरोधात्मक टोला
राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा! म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या. आता काळजी घ्यायलाच हवी. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार, अशी पोस्ट फेसबुक वर लिहित प्रशांत दामलेंनी सरकारला उपरोधिक टोला लगावला होता.
अभिनेता उमेश कामतनेही ‘फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?’, असा सवाल उपस्थित केला होता. आजूबाजूला पाहिलं तर सर्व गोष्टी सुरू झालेल्या दिसत आहेत. मग फक्त नाटक सृष्टी का थांबली आहे. कोरोना हा फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच असतो का, असं तो म्हणाला होता.