मुक्तपीठ

भुताटकी एका ‘भगता’च्या वाड्यातली !

- मुकुंद परदेशी (संपर्क 78750 77728)

भुतांना आवर घालण्यासाठी, जमलंच तर त्यांना ‘झाड’ सोडायला भाग पाडण्यासाठी विशेष नियुक्तीवर वाड्यावर रहायला पाठविलेले केसरसिंग भगत आपल्या शयनगृहात बसले आहेत. या वयातही ते दिवसभर ‘ती’ला घेऊन आपल्या शयनगृहातच असतात. अगदी महत्वाचं काम असलं तरच ते आपल्या शयनगृहातून बाहेर पडतात. ‘ती’ला शयनगृहाताच ठेऊन, दाराला कुलूप घालून, चारदा कुलूप ओढून, दार नीट बंद झाल्याची खात्री पटल्यावरच ते बाहेर जातात. अगदी सफाई कर्मचारी जरी शयनगृहाची साफसफाई करायला आला तरी दार उघडण्याआधी ते ‘ती’ला लपवून ठेवतात आणि तो जाताच ‘ती’ला परत जवळ घेतात. ते ‘ती’च्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.’ती’ला आपल्यापासून दूर करायला ते तयारच नाहीत, त्यासाठी कितीही बदनामी झाली तरी बेहतर. त्यांनी ‘ती’ची सुटका करावी म्हणून कोणीतरी कोर्टातही गेलंय म्हणे !

रात्रीचे नऊ वाजता आणि त्यांचा मोबाईल वाजतो. ‘ ये दोस्ती हम नही तोड़ेंगे – – ‘ चा रिंगटोन ऐकून ‘ करेक्ट वेळी’ आलेला हा फोन देवानाना नागपुरकरांचाच असावा हे ते ओळखतात.

भगतजी – हॅलो नाना. बोला.

देवानाना – हॅलो भगतजी. म्हटलं तुमची झोपायची वेळ झाली आहे, आहे ना ‘ती’ जवळ ?

भगतजी – (‘ती’ला छातीशी कवटाळत) आहे ना. अहो, माझ्या शयनगृहाताच ठेवतो मी ‘ती’ला. रात्रीचं तर सोडाच दिवसाही एकटी सोडत नाही मी ‘ती’ला. सवयच झाली आहे आता मला ‘ती’ची. नाहीतरी एव्हढ्या मोठया वाडयात कोणीतरी हवंच होतं सोबतीला. ‘ती’ आली आणि सोबत झाली बघा एकटया जीवाला. तसं मला थोडावेळ सोबत करायला, मी जास्त त्रास देऊ नये म्हणून अधूनमधून भुतं आपला एखादा प्रतिनिधी पाठवत असतात मला भेटायला. तो येतो, कमरेतून वाकून मला कुर्निसात करतो. दुसऱ्यादिवशी मला कुर्निसात करतांनाचा फोटोही छापतो, आपल्याच वर्तमानपत्रात, निर्लज्जासारखा !

देवानाना – ( समजवणीच्या सुरात) भगतजी, कोणी कुर्निसात घालो, की साष्टांग नमस्कार घालो , अजिबात म्हणजे अजिबात लक्ष द्यायचं नाही. अहो, या मंडळींना सवयच आहे ती ! खासगीत तर सोडाच , पण जाहीरपणेही त्यांचं सारखं, ‘हवं तर दोन्ही हात जोडतो, पाया पडतो.’ असंच सुरू असतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त ‘ती’ला सांभाळा . अजिबात म्हणजे अजिबात ‘ती’ला वाड्याबाहेर पडू देऊ नका.

भगतजी – ते करतो मी , पण ते वाट्टेल ते बोलतात हो मला , अगदी तोंडाचा डायरिया झाल्यासारखं . परवा तर तो एक बोलला , की ‘ मांडीखाली घेऊन उबवता की काय ‘ती’ला ? आतातरी सोडा.’ बोला काय बोलावं आपण ?

देवानाना – ( संतापून) हो म्हणा ना. बिनधास्त हो म्हणा. उबवतोय म्हणा मांडीखाली घेऊन, पण ही कावळ्याच्या घरात घातलेली कोकिळेची अंडी आहेत म्हणावं ! वाट पाहत राहा , अंड्यांतून बारा पिल्लं बाहेर येण्याची ! तुम्हाला सांगतो भगतजी, हा करोना – फिरोना काय आहे ना तो आटोपू द्या एकदाचा ; मग करतो मी यांचा ‘ करेक्ट कार्यक्रम’ ! मग काढू आपण बारा अंड्यांतून बारा पिल्लं बाहेर , पण ती कावळ्यांची नसतील तर कोकिळेची असतील ! हा-हा-हा !

भगतजी – हा-हा-हा ! ते बरोबर आहे ,पण ते ‘ती’च्याबद्दल सारखं विचारताहेत . काय सांगू ?

देवानाना – सांगून टाका , ‘ती’ वाड्यावर नाही म्हणून

भगतजी – अहो, पण ‘ती’ त्यांची आहे. त्यांचा हक्क आहे ‘ती’च्यावर. उशिरा तर उशिरा पण आपण ‘ती’ला परत पाठवायला हवी त्यांच्याकडे.

देवानाना -(ठामपणे ) भगतजी, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. ‘ती’ त्यांचीच आहे, पण आपण ‘ती’ला त्यांच्याकडे परत पाठवायची नाही. अहो, ते माहेर आहे ‘ती’चं आणि आपला वाडा म्हणजे सासर आहे ‘ती’चं . सासरी आलेली सवाष्ण माहेरी परत पाठवायची नसते काही.

भगतजी – नक्की ?

देवानाना – नक्की. पुढची जबाबदारी माझी. गुड नाईट.

भगतजी – गुड नाईट.

भगतजी कोणालातरी फोन करून ‘ती’ वाड्यावर नसल्याचं सांगतात आणि ‘ती’ला उशीखाली ठेऊन झोपी जातात.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात तांबडा रस्सा, पांढरा रस्सा छाप झणझणीत अग्रलेख झळकतो , ‘ राज्यपाल भवनात भुताटकी ! बारा नामनियुक्त आमदारांची फाईल भुतांनी पळविली !’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button