मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीबाबत चर्चा सुरु होती. त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा असे आदेश दिले आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातून मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष हजर होते.
पुढील काही महिन्यात राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. युतीच्या चर्चेत न पडता स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहा. युती होईल की नाही ते पुढे बघू असं त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय कमिटी नेमली जाणार आहे. ही कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल तयार करुन राज ठाकरेंना देणार आहे.
या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची टीम प्रत्येक महापालिका क्षेत्रात जाणार आणि तेथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. परंतु निवडणूक होणार की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळेला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल तेव्हा मनसेचा जाहीरनामा पुढे येईल असं त्यांनी सांगितले.
मनसेत गटाध्यक्षापासून नेते मंडळीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की, आपण आतापर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. यापुढेही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकारी आजही सज्ज आहे. २००९ पासून आम्ही कुणाशीही युती केली नाही. जर, तर यावर राजकारणात बोलून चालत नाही. समोरुन जर प्रस्ताव आला तर बोलणी सुरुच ठेवावी लागतात. युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील. बाकी कुणीही घेऊ शकत नाही. सगळ्याच महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली.
त्याचसोबत काही विषयांवर पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरेच भूमिका घेतील. टोकाची भूमिका घेऊ नका असा साहेबांचा सल्ला आहे. मुंबईचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. खूप लोकांनी हा प्रयत्न केला पण तसं होऊ शकत नाही. नेत्यांना वैयक्तिक मतं नसतात. पक्षाची भूमिका जी राज ठाकरे मांडतात तीच आमची भूमिका असते असंही नांदगावकर यांनी सांगितले.
कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही : संदीप देशपांडे
प्रभाग रचनेवरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन युतीचा विचार न करता कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, कितीही प्रभाग रचना बदलली, तरी लोकांची नाराजी दूर होणार नाही, असा टोला मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लोकं शिवसेनेवर नाराज आहेत. लोकांची मानसिकता शिवसेनेबरोबर जाण्याची नाही. त्यामुळे प्रभाग रचना बदलली असली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्यातरी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तरी आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कोरोना काळात मुंबईतील लोकांना खूप त्रास झाला. यावेळी सत्ताधारी शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली नाही. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत, असा दावाही देशपांडे यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुंबईसह १५ महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मनसेने इंजिनाची दिशा बदलली, नंतर झेंडा बदलून हिंदुत्ववादाच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपबरोबर युतीची चर्चाही सुरू झाली. परंतु, भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे निवडणुकीत कोणती रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याची चर्चा आहे.