मुंबई: दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने घाव घेतली असून, ८ गाड्या रवाना झाल्या आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील ५८ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, यापैकी २० जण कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आर्थर रोडजवळ आहे. इथे एलपीजी गॅस पाईपलाईन लीक झाली. सकाळी ११.३० च्या दरम्यान गॅस गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे, तिथे अधिक रुग्ण नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ई बसेस लोकार्पण सोहळा सोडून, रुग्णालयाकडे रवाना झाल्या.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनाही अन्य ठिकाणी जाण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एलपीजी गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याचे समजताच इमारतीतील सर्व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.