२०२४ पर्यंत जागतिक दर्जाचा ६० हजार किमीचा महामार्ग बनविण्याचे लक्ष्य : गडकरी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रस्ते विकास प्राधिकरणाच्या १६ व्या वार्षिक समारंभात सहभाग नोंदवला. यावेळी, बोलताना देशात ६० हजार किमी लांबीचा जागतिक दर्जाचा महामार्ग बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला २०२४ पर्यंत ते पूर्णही करायचे आहे. त्यासाठी, दिवसाला ४० किमीचा रास्ता बनिवण्यात येईल, असे गडकरींनी सांगितले.
गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी देशातील विविध भागांत रस्ते रुंदीकरण आणि नव्याने रस्ते बांधणी कामासाठी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अनेकठिकाणी या कामाच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत.
भारतात जवळपास ६३ लाख किमीचे रस्ते दळणवळण आहे, जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा रस्ते महामार्ग आपल्या देशात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या नेटवर्कमुळे शक्य होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारकडून १.४ ट्रिलीयन डॉलर (१११ लाख कोटी रुपये) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास ३४ टक्क्यांनी वाढ करण्यात येते. यंदाही ५.३४ लाख कोटी रुपयांचा भरीव निधी वाढवून देण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.