Top Newsराजकारण

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्या सुनावणी

मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी हजर राहाण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत राज्याच्या लोकायुक्तांकडून गुरुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कोटेचा यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्तांना या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे.

आमदार कोटेचा यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊन काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावे‌त, असे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. त्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट १५० कोटींवरुन १०० कोटींवर आणण्यात आली. याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. निविदा शर्तीमधील बदल संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवावेत, अशी सूचना महामंडळाचे व्यवस्थापक पांडुरंग राऊत यांनी केली होती. मात्र, परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आधी निविदा प्रसिध्द करावी व त्यानंतर संचालक मंडळाकडून त्यास मान्यता घ्यावी, असे आदेश काढले.

निविदा अटीतील बदल परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांच्या मर्जीतील गुजरातमधील एका विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्यासाठी करण्यात आले आहेत, असा दावा कोटेचा यांनी केला आहे. बदललेल्या अटींनुसार निविदा मंजूर झाल्यास परिवहन महामंडळाला विनाकारण २५० कोटींचा भुर्दंड बसणार आहे. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी कोटेचा यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button