आरोग्य

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचे लसीकरण मोफत; सरकारचा मोठा निर्णय

१ मे पासून लसीकरण सुरु करण्यात अडचणी

मुंबईः कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्यानं मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लसीचे १२ कोटी डोस लागणार असल्याची माहिती आहे. मोफत लसीकरणामुळं राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

१ मेला लसीकरण सुरु करण्यात अडचणी

गेल्याकाही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. आजही मुंबई- पुण्यासह अनेक लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यानं अनेक नागरिकांना माघारी परतावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी १ मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मात्र, लसीच्या कमतरतेमुळं १मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, ४५ वर्षांच्या वयोगटातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरुच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १ मेपासून लसीकरण शक्य नाही,’ असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘१८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘साधारणपणे आपण ६ महिन्यांत हा लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागतील. त्यानुसार महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागतील. ही राज्य शासनाची क्षमता आहे. १३ हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्यामुळे राज्यात रोज १३ लाख लसीकरण करता येऊ शकेल. महाराष्ट्र देशात सर्वात कमी लसी वाया जाण्याचं प्रमाण आहे. सध्या राज्यात १ टक्के लसी वाया जाण्याचं प्रमाण असून देशातल्या ६ टक्के या प्रमाणापेक्षा ते कमी आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी

लसीकरणासाठी जाताना कोविन अ‍ॅप वापरुन रजिस्टर करुन मगच केंद्रावर जावं. जे लसीकरण होईल ते कोविन अ‍ॅपच्या माध्यमातूनच होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button