Top Newsराजकारण

कणकवलीतील हल्ला प्रकरणी चारजणांना अटक; कोकणातील राजकारण तापले

हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा : केसरकर

कणकवली : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणार्‍या चौघा हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी पकडले असून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार (MH 14 – BX 8326) फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली. त्यानंतर आतील चारही संशयितांना ताब्यात घेत ओरोस पोलीस स्टेशनला आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाजाआड कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र, चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

परब वरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब यांची विचारपूस केली होती. या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगितले.

सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चार नगरपंचायत निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, चारही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा : केसरकर

काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या नावावर घेतलेल्या बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणी तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष राजन तेली यांची ठाणे पोलीसाच्या अर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून हा तपास सिंधुदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हा तपास राज्याच्या स्तरावर केला जावा तसेच पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद यापूर्वी आम्ही संपवला आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूका आल्यानंतर असे हल्ले करून दहशत निर्माण करण्याची राणेची जुनी सवय आहे.मात्र ही दहशत जिल्हा बँक निवडणुकीत जनता खपवून घेणार नाही.जिल्हा बँकेचे जे ९८२ मतदार आहेत त्याची यादी पोलीसांकडून मागवण्यात आली असून पोलीस आपल्या पध्दतीने काम करतील पण पोलीसांनी अशी दहशत खपवून घेऊ नये अशी मागणीही केसरकर यांनी केली आहे.

कणकवलीत शिवसेनेच्या माजी सरपंचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत मात्र आमदार नितेश राणे हे उद्योजक किरण सावंत व खासदार विनायक राऊत यांनी हा हल्ला घडवून आणला अशा प्रकारची टीका करून स्वतःचे अज्ञानच पाजळत आहेत. आमदार नितेश राणे व निलेश राणे हे दोघे बालिश आहेत. त्यामुळे आगामी काळात होवू घातलेल्या निवडणूकांमध्ये पुन्हा दहशतवादाला येथील जनतेने सत्तेपासून दूर ठेवावे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक व पदाधिकारी मतदारांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी जिल्ह्याबाहेर जावे अशी मागणी ही केसरकर यांनी केली आहे.

अंकुश राणे खून प्रकरणाची फाईल पन्हा उघडावी

आमदार नितेश राणे यांनी आपली कुठलीही प्रकरणे बाहेर काढा असे आव्हान सरकारला देत असतील तर सरकार ही तयार आहे. मी गृहराज्यमंत्री असताना विधानसभेत अंकुश राणे खून प्रकरणाची फाईल पुन्हा सरकार उघडून सखोल तपास करेन असे सांगितले होते. याची आठवण करून देत केसरकर यानी मी स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी करेन असे सांगितले. राणेना ही वाटत असेल आपल्या काकाना न्याय मिळावा असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button