Top Newsराजकारण

भाजपला मोठा झटका : राजकीय संन्यास घेणाऱ्या बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल प्रवेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले’, असं ट्विट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली होती. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा होती.

गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले आहेत. त्यात म्हटलंय की, टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीत प्रवेश झाला आहे. सुप्रियो यांचे तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button