तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत ई. राजेंद्र यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
ई. राजेंद्र यांच्याविरोधात काही तक्रारी आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी लगेचच राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप पक्षात ई. राजेंद्र यांचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलंगणच्या राजकारणात ई. राजेंद्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवेल, असा विश्वास प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातून ई. राजेंद्र आमदार होते. राजेंद्र यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी कमळ हाती घेतले.
दरम्यान, राजेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालकी असलेल्या कंपनीकडून राज्यातील जमिनींवर कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली होती. पक्षाध्यक्षांना भेटून मला राजीनामा द्यायचा होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पक्ष सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला, अशी प्रतिक्रिया ई. राजेंद्र यांनी दिली. अनेकांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मतदारसंघ आणि तेलंगणातील नागरिकांच्या आत्मसन्मानासाठी राजीनामा द्यावा लागला, असे राजेंद्र यांनी नमूद केले.