शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन
पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे माजी खासदार गजानन धरमसी बाबर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी चार वाजता बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. पोटाच्या विकारामुळे बाबर यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर गेली तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावलली.
सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू, लोकाभिमुख राजकारणी अशी बाबर यांची प्रतिमा होती. कामगारनगरी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उभी करण्यात बाबर यांचे मोठे योगदान होते. दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काळभोरनगर येथे शिवसेनेची प्रथम शाखा त्यांनी स्थापन केली. घरमालक आणि भाडेकरूंच्या वादावर पर्याय काढण्यासाठी बाबर यांनी भाडेकरूंसाठी संघटना स्थापन केली होती. नंतर नगरपालिकेत १९७८ मध्ये ते नगरसेवक होते. पुढे १९८६ मध्ये महापालिका स्थापन झाल्यावर काळभोरनगर प्रभागातून तीन वेळा नगरसेवक झाले.
हवेली तालुका विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा शिवसेनेचे आमदार झाले. त्यानंतर २००९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी शिवेसनेच्या तिकीटावर निवडूण आले. संसदरत्न पुरस्कारानेही बाबर यांना गौरविले होते. तसेच पिंपरी चिंचवड व्यापारी संघटनेचे गेली २५ वर्षे अध्यक्ष, सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असतानाही गेली १५ वर्षे बाबर हे या कारखान्याचे उपाध्यक्ष होते. बाबर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.