गाझियाबाद: शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. धर्म बदलल्यानंतर त्यांचे नवीन नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्म मिळवून दिला आणि त्यानंतर रिझवी यांचे नाव बदलले. यावेळी नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत.
हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले की, मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी सनातन धर्म निवडला कारण तो जगातील सर्वात जुना धर्म आहे. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे, तसेच हवन-यज्ञही होणार आहे. महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत.
वसीम रिझवी मूळचे लखनऊचे आहेत. सन २००० मध्ये ते लखनऊच्या मोहल्ला काश्मिरी वॉर्डातून सपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले आणि नंतर चेअरमन झाले. वसीम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली. या याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वसीम रिझवी यांना दंडही ठोठावला होता.
रिझवी आता पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतेच ‘मोहम्मद’ हे पुस्तक लिहिले होते. यावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. रिझवी यांनी या पुस्तकाद्वारे पैगंबरांच्या गौरवाचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरुंनी व्यक्त केली आहे. त्यानंतर वसीम रिझवींनी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता.