डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाचा संसर्ग; ‘एम्स’मध्ये दाखल
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ८८ वर्षीय मनमोहन सिंह यांनी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे म्हणजेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एम्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना ट्रोमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच ते ठीक होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी वी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोष सिसोदियासह अनेक नेत्यांनी त्यांच्याबाबत ट्वीट करून प्रार्थना केली आहे.
कोरोना संसर्गावरुन कालच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं. मनमोहन सिंग यांनी या पत्रातून नरेंद्र मोदी यांचं कोविडमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. एकून पाच मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेलं नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिलेलं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेलं नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकललं आहे. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.