माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
पुणे : जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे सोमवारी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी संभाजीराव काकडे यांची ओळख होती. १९७१ मध्ये विधान परिषदेवर पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती. तर १९७७ मध्ये जनता दलाच्या लाटेत बारामती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरही एकदा पोटनिवडणुकीत याच मतदारसंघातून ते विजयी झाले होते. जनता पक्ष तसेच जनता दलाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील एक वजनदार घराणे म्हणून काकडे यांचा लौकिक होता. १९६७ साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निकटच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मागील वर्षभरापासून काकडे हे आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जनता दलाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी संभाजीराव काकडे त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना पक्षाचा मार्गदर्शक गेला, अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे. तर नव्या कार्यकर्त्यांना घडविणारे, त्यांना संधी देणारा नेता म्हणजे संभाजीराव काकडे होते, असे प्रदेश जनता दलाचे युवा अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी म्हटले आहे. मुंबई जनता दलाच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनीही आदरांजली वाहिली आहे.
माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले.
शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2021
काकडे यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!, असे ट्विट करत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.