स्पोर्ट्स

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला अटक

मेलबोर्न : क्रिकेटर्स जेवढे त्यांच्या खेळामुळे चर्चेत राहतात, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. अनेकवेळा हे क्रिकेटपटू मैदानावर केलेल्या गैरकृत्यांमुळे वादात सापडतात. त्याचबरोबर मैदानाबाहेरही केलेल्या कृत्यांमुळे हे खेळाडू मोठ्या अडचणीत सापडतात. असेच काहीसे आता एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत घडले आहे, ज्याला मोठ्या आरोपांनंतर अटक करण्यात आली आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक मायकेल स्लेटरला या वर्षी ऑक्टोबरमध्ये कथितपणे घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी बुधवारी, १५ डिसेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, त्याने कथितपणे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, ज्याला हिंसाचार आदेश किंवा एव्हीओ म्हणून ओळखले जाते.

न्यू साउथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितले की, मायकेल स्लेटरला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. त्याला सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याला जामीन नाकारण्यात आला, कारण त्या दिवसानंतर त्याला न्यायालयात हजर करणार होते. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पोलिसांनी सांगितले की, ५१ वर्षीय व्यक्तीवर विहित निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये, स्लेटरला पोलिसांनी सिडनी येथून एका कथित प्रकरणात अटक केली होती, जिथून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणामुळे स्लेटरला २०२१-२२ या हंगामासाठी समालोचन पॅनेलमधून नुकतेच वगळण्यात आले.

माजी सलामीवीर मायकेल स्लेटर जवळपास १० वर्षे ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५,३१२ धावा आहेत. २००४ मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने कॉमेंट्री (समालोचन) करायला सुरुवात केली. स्लेटरला कौटुंबिक हिंसाचार आणि जामिनाचा भंग केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. स्लेटरला पहिल्यांदा १२ ऑक्टोबर रोजी कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button