पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, गोळीबारात ५ जणांचा मृत्यू
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण अधिक तापले आहे. पंतप्रधान मोदींकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
कूचबिहारमध्ये सीतलकुची भागामध्ये हा प्रकार घडला आहे. मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन या मतदारावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात आनंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सितालकुचीमध्येही १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरही झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही जमाव ऐकत नसल्याने सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या घटनेमुळे मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ४४ जागांवर सकाळपासून मतदान सुरु होते. दरम्यान सीतालकु भागातही एका मतदान केंद्रावर मतदान सुरु होते. यावेळी मतदानासाठी रांगेत उभ्या असेलल्या आनंद बर्मन या युवकावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या घटनास्थळी दाखल होत राडा घातला. यावेळी मतदान केंद्रावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. आनंद भाजपाच्या कार्यकर्ता असल्याने त्याची हत्या तृणमूल काँग्रेसने केली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
सीतालकु भागातील घटनेनंतर सीतालकुमधीलच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही जमाव ऐकत नव्हता. यावेळी जमावातील काही लोकांनी केंद्रीय सुरक्षा पथकातील जमावानांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाईलाजाने सुरक्षा रक्षकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ममता बॅनर्जींची मागणी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की “इतक्या लोकांना मारल्यानंतर ते (निवडणूक आयोग) म्हणत आहेत की गोळीबार स्वसंरक्षणासाठी करण्यात आला होता. त्यांना लाज वाटली पाहिजे. हे खोटे आहे. सीआरपीएफने रांगेत उभे असलेल्या लोकांवर गोळीबार केला. मतदान आणि सीतलकुचीमध्ये चार जणांना ठार मारले. मला बऱ्याच दिवसांपासून अशी कारवाई होईल, अशी भीती वाटत होती. भाजपला माहित आहे की त्यांनी जनाधार गमावला आहे, त्यामुळे ते लोकांना मारण्याचा कट रचत आहेत.”
शाह यांनी रचलेल्या कटातील हा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बॅनर्जी म्हणाल्या, मी सर्वांनी शांत राहून शांततेत मतदान करण्याचे आवाहन करते. त्यांचा पराभव करुन त्यांचा बदला घ्या. तीन वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा या निवडणुकीत मारल्या गेलेल्या लोकांची संख्या जास्त आहे.”
त्या म्हणाल्या, की “जर तुम्ही निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत मारल्या गेलेल्या लोकांची संख्या मोजली तर सुमारे 17-18 लोक मारले गेले आहेत. किमान 12 लोक फक्त आमच्या पक्षाचे होते. आज घडलेल्या घटनेविषयी निवडणूक आयोगाने लोकांना स्पष्टीकरण द्यावे. आम्ही प्रशासनाचे प्रभारी नाही तर आयोग प्रशासनाचे प्रभारी आहेत.”