मुंब्रा येथील हॉस्पिटलमध्ये आग; चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे: मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेअर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये १४ तर अतिदक्षता विभागात ६ रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले.
मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने अतिदक्षता विभागातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली. यास्मिन शेख (४६ वर्षे), नवाब शेख (४७ वर्षे), हलिमा सलमानी (७० वर्षे), हरीश सोनावणे (५७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्कजवळील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर रुग्णालय आहे. पहाटे पावणे चारच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्शिमन दलाने ही आग विझवली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेमुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा आणि फायर ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचा नगरसेवक आमनेसामने
दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना अनपेक्षित विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक शानु पठाण किरीट सोमय्या यांना बघताच आक्रमक झाले. त्यामुळे प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला. एखादी दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे ही काही नवीन बाब नाही. त्यानुसार किरीट सोमय्याही बुधवारी सकाळी प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानु पठाण यांनी ‘किरीट सोमय्या वापस जावो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले. आम्ही लोकांना वाचवण्याचे काम करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी राजकारण करु नये, असे शानु पठाण यांनी किरीट सोमय्यांना सुनावले. त्यानंतर किरीट सोमय्या काहीवेळातच पाहणी करुन घटनास्थळावरून निघून गेले.