भांडूपमध्ये मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग; ३ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
रात्री 12 च्या सुमारास मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या आगीचा धूर सनराईज रुग्णालयात पसरला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची धावपळ उडाली. यानंतर अग्निशमन दलाने उपचार घेत असलेल्या 76 रुग्णांना दोन शिड्यांच्या मदतीने बाहेर काढले. याच दरम्यान ही आग प्रचंड वाढली.
महापौरांकडून चौकशीचे आदेश
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.