मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल (एमपीएससी) आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. २०१९ साली ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे, तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे. मागास वर्गातून रोहन कुंवर याने पहिला क्रमांक मिळवला आहे.
उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार पदांसाठी ही भरती घेण्यात आली होती. या निकालात निवड झालेल्या एकूण ४२० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवारांना आता एमपीएससीनं दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ते १५ जुलै, २०१९ या कालावधोत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०१९ घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला होता. मात्र आता अखेर शासन निर्णयानंतर हा निकाल लावण्यात आला आहे. शासनाकडून आलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदं ही खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.
पुण्यातील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं नियुक्ती नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात एमपीएससीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता हा निकाल लावण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी २६ प्रकारची पदे भरली जाणार आहेत. सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.