अदानींच्या विमानातून नरेंद्र मोदींचा विमान प्रवास; शेतकऱ्यांचा सणसणीत टोला
नवी दिल्ली – गेल्या कित्येक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाला आता तब्बल सात महिने पूर्ण झाले. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक झाल्याची अफवाही पसरली होती. मात्र नंतर टिकैत यांना अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांच्या दाव्यानुसार राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचा आरोप केला जातो. यावरुनच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसल्याचं दिसत आहे. मोदींसोबतच उद्योगपती गौतम अदानीसुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिंह यांनी, ‘टिकैत शेतकऱ्यांचं हित जपणारे नेते नाहीत, अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत,’ असा सणसणीत टोला लगावला आहे.
आय. पी. सिंह यांनी पुन्हा नरेंद्र मोदींचा जुना फोटो ट्विट केल्यानंतर त्यावरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. सिंह यांनी याआधीही मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून ४ लाख कोटी केले वसूल केले असं म्हणत निशाणा साधला आहे.