फडणवीसांची मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंशी पक्ष बांधणीवर चर्चा; नाथाभाऊ मात्र मुंबईत !
जळगाव: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष बांधणीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव भाजपला गळती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. त्यांनी मुक्ताईनगरमध्ये थेट एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते गिरीश महाजनही उपस्थित होते. फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच जळगावमध्ये खास करून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यापासून जळगाव भाजपमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधी गेला आहे. खडसे गेल्यानंतर पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड रोखण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. फडणवीस यांनी या भेटीत पक्षाच्या बांधणीवरच रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केल्याने फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं बोललं जात आहे.
फडणवीस जवळपास अर्धा तास खडसे यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना झाला. या ठिकाणी त्यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. नंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन केळी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला
खडसे यांच्या घरातून निघून नुकसानीची पाहणी करत असताना काही शेतकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा अडवला. यावेळी त्यांनी सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसून आम्हाला मदत करावी, असं आवाहन फडणवीसांना केलं.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा
विरोधी पक्षनेते जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी थेट शिवारात गेले होते. शेतकऱ्यांचं प्रंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १०० टक्के केळीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, विमा कंपन्यांनी सरसकट मदत केली पाहिजे. विमा कंपन्या कारण देऊन अडचणी निर्माण करत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांनाही सरकारने विमा काढला आहे असे समजून ५० टक्के मदत केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विम्याची रक्कम मिळताना अडचण होत आहे. विशेषता मागच्या काळात युतीचं सरकार असताना आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली होती. हरिभाऊ जावळे कमिटीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवले होते. या निकषानुसार टेंडर काढण्यात आले होते याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला होता. मात्र मागच्या वर्षी या कमिटीचे निकष बदलण्यात आले त्यानुसार टेंडर काढण्यात आला आहे. याचा जास्त फायदा विमा कंपन्यांना होत आहे. यामुळे हरिभाऊ जावळे यांच्या निकषानुसार केळीचा विमा उतरवला पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.