खंडणीबहाद्दरांना समर्पण काय समजणार, यांचं चौकातलं भाषण; फडणवीसांचे ठाकरेंवर थेट वार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत हल्लाबोल केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफानी हल्ला चढवला. “मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती नाही, अज्ञानातून त्यांनी भाषण केलं. जे खंडणी वसुली करतात, त्यांना राम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं, त्यांच्याकडून हे शक्यच नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याशिवाय बाबरी मशीद पाडण्यासाठी आम्ही होतो, यांचा एकही माणूस नव्हता. हे जे बोलत आहेत, यांच्यातील एकही नव्हता, ढाचा पाडण्यासाठी हजारो कारसेवक होते, आम्ही होतो, असं फडणवीस म्हणाले. भाजपाने महाविकास आजघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना जोरदार भाषण केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर भाजपाने सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभरात ते बोलले पण ते महाराष्ट्रात येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिकेत गेले, पंजाब, साऊथ, काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले. पण ते महाराष्ट्राबद्दल तासभरात एक वाक्यही बोलू शकले नाही. खरंतर मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत. त्यामुळे चौकातले भाषण आणि सभागृहातील भाषण यातलं अंतर मुख्यमंत्र्यांना अजूनही लक्षात आलेले नाही, सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांवर बोलावं लागत. राज्यातील प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्देवाने शेतकऱ्यांसंदर्भात एक मुद्दा ते बोलू शकले नाही. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याबद्दल बोलले नाहीत, बोंड आळीबद्दल ते बोलले नाहीत. विम्याबद्दल ते बोलले नाहीत. वीज तोडणीबद्दल ते बोलले नाहीत. महाराष्ट्रात साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चिंता कुणाची आहे? तर दिल्लीत सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाती आहे, याची चिंता त्यांना आहे. अशी टीकाही केली.
मुख्यमंत्र्यांनी सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आली की पळे’ असे जे मुख्यमंत्री म्हणाले हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे. ज्या सैनिकांनी उणे ३० डिग्री तापमानात लढाई करून, भारताची एक इंच भूमी चीनला मिळू दिली नाही आणि चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक इंच भूमी देखील चीनला मिळाली नाही, त्या शूर सैनिकांचा जणू काही ते पळपूटे आहेत असा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे.” असा आरोप फडणवीस यांनी केला.
खोट बोल पण रेटून बोल
अमित शहा यांच्याबद्दल बोलताना उसण अवसान बोलून खोट बोल पण रेटून बोल असे मुख्यमंत्र्यांचे रुप पाहयला मिळाले. संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील एकाही मुद्द्यावर ते बोलले नाही. असे फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही ठरवणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडीला लावून बसले आहेत आणि ते आम्हाला हिंदुत्व शिववत आहेत असेही ते म्हणाले.
सरकारने राज्यपालांनी केलेले भाषण कोणतीही दिशा देणारं नव्हते तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषण चौकातले भाषण होते या भाषणाने जनतेची निराशा केली आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केली की आम्ही महाराष्ट्र द्रोही, आम्ही बोललो की आम्ही महाराष्ट्र द्रोही पण तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. राम मंदिराच्या संदर्भात हे कोणीच नव्हते हे घरी बसली होते, खंडणी वसुल करणाऱ्यांना जनतेच्या समर्पणाची सुई टोचत आहे. जनता पैसे देत आहे यांना समस्या काय आहे? असा सवाल उपस्थित केला. आमचे राजकीय विरोधक असतील पण शत्रू कोणी नाहीत असे ते म्हणाले.