मुंबई : इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (सीईटी) ऑनलाइन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे बोर्डकडून सांगण्यात आले आहे. २१ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी सीईटी परिक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला नाही किंवा भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असे देखील बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
२० जुलै सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते २६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. कालपासून ११ वी सीईटी परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे http://cet.mh-ssc.ac.in/ संकेतस्थळवर विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. शिवाय, काल आणि आज बराच वेळ हे संकेतस्थळ बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी बोर्ड तसेच शिक्षण विभागाला प्राप्त होत होत्या. त्यामुळे यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून ही सुविधा पूर्ववत करण्याचे प्रयत्न बोर्डकडून केले जातील. याआधी सुद्धा दहावीच्या निकलावेळी १६ जुलै रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार होता. मात्र, बोर्डाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने ७ तासानंतर विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहता आले. त्यावेळी सारखा मनस्ताप अकरवी सीईटी परीक्षा अर्ज भरताना सुद्धा विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण लवकर दूर व्हावी अशी अपेक्षा परीक्षार्थी करत आहेत.