लॉकडाऊनचा परिणाम; राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत होती. दिवसाला ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती. पण आता कडक लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसत आहे. सोमवारी मुंबईसह राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५२४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ७१ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.
आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६५ हजार २८४ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून ३६ लाख १ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ७४ हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५९ लाख ७२ हजार १८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४३ लाख ४३ हजार ७२७ (१६.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७८ हजार ४२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३० हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.