आनंदराव अडसुळांना ‘ईडी’ लवकरच ताब्यात घेणार !
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे काही काही मंत्र्यांना ईडीने समन्स बजावला आहे. आता शिवसेनेला यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आणि सीटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ‘ईडी’चे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोरेगावमधील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ‘ईडी’चे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. यावेळी आनंदराव अडसूळ यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या सोबत हाँस्पिटलमध्ये आहेत.
आज सकाळी १० वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आनंदराव अडसूळ गेले ९ तास हाँस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठिक झाल्यावरच त्यांना ‘ईडी’चे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.