शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, त्यांच्या मुलाला ईडीचे समन्स
अमरावती : शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांना सिटी को-ऑप बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना देखील ईडीचे समन्स बजावण्यात आले. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये ९०० कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.
दरम्यान, आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले होते. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली होती.
आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. त्याआधारे ईडीने बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. अभिजित हे २००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या.