मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या तीन मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिग प्रकरणाशी असलेल्या संबंधांवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. दरम्यान, काल अनिल परब यांना ईडीने नोटिस पाठवल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तसेच या नोटीसीवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्याने अनिल परब वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर काल त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले होते. तसेच येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली होती. १०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले होते.
परब यांची धावाधाव
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून, १० मिनिटांत ते माघारी फिरले, असे सांगितले जात आहे. अनिल परब यांना रविवारी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्यानंतर सोमवारी छापा टाकला. यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून छापा टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या भेटीसाठी अनिल परब सामना कार्यालयात पोहोचले. ईडीने पाठवलेल्या नोटीसमुळे संजय राऊत आणि अनिल परब यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या, असे सांगितले जात आहे. अनिल परब घाईघाईने सामना कार्यालयात आले. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये केवळ दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अनिल परब ज्या वेगाने आले, त्याच वेगाने ते परत गेले. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी विचारणा केली, पण काहीही न बोलता, अनिल परब घाईघाईत निघून गेले, असे सांगितले जात आहे.