राणा कपूर, बिंदू कपूर, गौतम थापर यांच्याविरुद्ध ईडीचे आरोपपत्र
नवी दिल्ली : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि अवंता समूहाचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील मनी लॉण्ड्रिंग कायदा (पीएमएलए) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
लुटियन्स दिल्लीमधील एक बंगला खरेदी करण्यासाठी १,९०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी एका रिअल्टी कंपनीकडून ३०७ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या विरुद्ध आहे. ईडीने दाखल केलेल्या ८० पानी आराेपपत्रात दहा व्यक्ती व संस्थांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यात आरोपी असलेल्या ब्लिस अबोड प्रा. लि. या कंपनीत बिंदू कपूर आणि येस बँकेचे काही अधिकारी संचालक आहेत.
प्राप्त माहितीनुसार, लुटियन्स दिल्लीमधील १.२ एकर भूखंडावर स्थित असलेला बंगला ब्लिस अबोड कंपनीला विकण्यात आला होता. हा बंगला कपूर पतीपत्नींनी २०१७ मध्ये ३७८ कोटी रुपयांत खरेदी केला होता. मात्र तो इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीकडे ६८५ कोटी रुपयांना तारण ठेवण्यात आला. खरेदी आणि तारण किमतीतील तफावतीची रक्कम थापर यांनी कपूर यांना लाच म्हणून दिल्याचा संशय आहे. तसेच नंतर १,१०० कोटी रुपयांचे कर्जही देण्यात आले.