आमदार प्रताप सरनाईकांच्या निकटवर्तीयाला ‘ईडी’कडून अटक
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला अटक केलीय. ईडीकडून अटक करण्यात आलेल्या या व्यावसायिकाचं नाव योगेश देशमुख असं आहे.
17 मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. यावेळी योगेश देशमुख यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती आता NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात योगेश देशमुख यांना अटक झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे 17 मार्चला योगेश देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.