मुक्तपीठ

सुवर्णनगरीतील भूकंप

- भागा वरखडे

आपल्या संतांनी फार पूर्वीच पेरिले ते उगवते असे सांगून ठेवले आहे. त्याची प्रचिती राजकारणात वेळोवेळी येते.त्याचा अर्थ तुम्ही चांगले केले, तर त्याची फळेही चांगलीच येतील आणि वाईट कर्म असेल, तर फळेही वाईटच मिळतात. निंबाच्या झाडाच्या मुळाला साखर घातली, तरी फळांमध्ये गोडवा येत नाही. फळे त्यांचा मूळ गुणधर्म दिसत नाही. फोडतोड करून सत्ता मिळविली, की नंतर ज्यांनी फोडतोड केली, त्यांच्या पक्षातही फोडतोड होते.

भारतीय जनता पक्षाने गावपातळीपासून देशपातळीपर्यंत तेच केले. आता त्याची फळे सांगली, जळगावात दिसली. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत असतानाही सांगली आणि जळगावच्या महानगरपालिका भाजपच्या ताब्यातून गेल्या, तर भिवंडीचे सभागृहनेतेपद गेले. त्यात जळगावचा आघात पक्षाला सहन होण्यापलीकडचा आहे. त्याचे कारण संकटमोचक म्हणून ज्यांचा राज्यभर नावलौकिक आहे, त्या गिरीश महाजन यांनाच संकटात आणण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. ज्या खडसे यांना देवेंद्र फडणवीस, महाजन या दुकलीने त्रास दिला, त्यांना भाजपबाहेर जायला भाग पाडले, त्या खडसे यांनीच आता या दुकलीला शह द्यायला सुरुवात केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील आजी, माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणायला सुरुवात केली आहे. जळगाव महापालिकेची सत्ता खडसे आणण्यात खडसे यांचे मोठे योगदान होते. आता तेच भाजपत राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना भाजपतून बाहेर काढायचे ठरविले आहे. जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाहीत. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षाच्या नगरसेवकांसोबत भाजपचे फुटीर नगरसेवक आले, तर जळगावात सत्ता येऊ शकते, असा विचार त्यांनी सर्वांत अगोदर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा केली. गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यांशी चर्चा केली. भाजपत नाराज नगरसेवकांची संख्या वाढत होती. या नाराज नगरसेवकांना बरोबर घेतले, तर भाजपच्या सत्तेला ग्रहण लागू शकते, हे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी सुरेश जैन यांच्यांशीही राजकीय शत्रुत्व विसरून मांडवली केली. सांगलीत जयंत पाटील यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून भाजपची सत्ता उलथवून टाकली, तेच जळगावात घडले. एमआयएम आणि शिवसेनेत कितीही वाद असले, तरी भाजपला दूर ठेवण्यासाठी जळगावात ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केले. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवले आहे.
भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून महापालिकेत भाजपच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने फोडाफोडीच्या राजकारणाने आपला खुंटा मजबूत केला होता. तोच कित्ता शिवसेनेने गिरवला. गिरीश महाजन यांना घरच्या धावपट्टीवर त्यांना चितपट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक फुटल्याने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांची कोंडी झाली. 75 सदस्य असणार्‍या महापालिकेत भाजपचे 57, शिवसेनेचे 15, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते; पण जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागले. शिवसेनेने ही ग्रँड फाईट 45 विरूध्द 30 अशा फरकाने जिंकली. महापालिकेत भाजपला असणारे भक्कम बहुमत पाहता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती. पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या पदांसाठी अर्ज घेतानादेखील असाच दावा केला होता. अर्थात, दोन्ही पदांसाठी नवनवीन नावे समोर आल्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली. यातच भाजपमध्ये उभी फूट पडण्याचे संकेत मिळताच खळबळ उडाली. शिवसेनेने असंतुष्ट भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील आणि इतरांच्या मदतीने भाजपला हादरा दिला. भाजपने यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. निवडणूक टाळण्याचा प्रयत्न न्यायालयातूनच अयशस्वी ठरला. भाजपने पहिल्यांदा शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांना रद्द करण्याची मागणी केली; मात्र ही मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फेटाळून लावली. निवड प्रक्रिया सुरू असताना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम 2005 च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. तो दावाही टिकला नाही. इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. गेल्या अनेक वर्षात भाजपने केलेल्या खोट्या आश्‍वासनांमुळेच त्यांचे नगरसेवक बंडखोर झाल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाला जळगाव आणि सांगलीच्या उदाहरणातून मात्र करावे तसे भरावे, या म्हणीची अनुभुती आली आहे. विकासाच्या नावाखाली सत्तांतरे जशी घडवून आणता येतात, तशीच ती घडतात हे आता भाजपला पटले असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button