मुंबई/पुणे : राजधानी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अखेर उच्च न्यायालयाकडूनआर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी न्यायालयाकडून आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला, त्याचदिवशी आर्यन खानला पकडून एनसीबीच्या ताब्यात देणाऱ्या किरण गोसावीला अटक झाली आहे. विशेष म्हणजे किरण गोसावीला ८ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली.
आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र, तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र, रात्रीच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता, पुणे सत्र न्यायालयाने त्यास ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये किरण गोसावी हा पंच होता. तसेच आर्यन खानला ताब्यात घेताना तो समीर वानखेडेंसोबत दिसत होता. दरम्यान, किरण गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर तो काय गौप्यस्फोट करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला फरासखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथून त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. एका जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. मात्र आता प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांप्रकरणीही त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.