डोपिंगमध्ये दोषी : कुस्तीपटू सुमित मलिकवर दोन वर्षांची बंदी
नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सुनील मलिक यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकला मुकणार हे आता निश्चित झाले आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळल्यामुळे संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने सुमितवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीचा कालावधी ३ जूनपासून सुरु झाला आहे. ही शिक्षा मान्य करायची की त्याविरुद्ध दाद मागायची, हे ठरवण्यासाठी २८ वर्षीय सुमितला एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे.
बल्गेरिया येथे झालेल्या पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सुमित १२५ किलो वजनी गटामध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतु, या पात्रता स्पर्धेतच उत्तेजक द्रव्य चाचणीत तो दोषी आढळला होता. त्यामुळे मागील महिन्यात त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनला त्याच्या ‘बी’ सॅम्पलची चाचणी झाली आणि त्याचाही निकाल सॅम्पल ‘ए’प्रमाणेच आला. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असून या बंदीचा कालावधी ३ जूनपासून सुरु झाला आहे.
सुमित मलिकने याआधी आपण कोणतेही प्रतिबंधित द्रव्य घेतले नसल्याचे सांगितले होते. उजव्या गुडघ्याला दुखापत असल्याने आपण केवळ ‘पेन किलर’ घेतल्याचे तो म्हणाला होता. त्यामुळे २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमित आता युडब्ल्यूडब्ल्यूने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध दाद मागणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. परंतु, तो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही हे निश्चित झाले आहे.