देशांतर्गत विमान प्रवास १ जूनपासून महागणार
नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे जनता हैराण असताना आता दुसरीकडे येत्या १ जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा १३ ते १६ टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या १ जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना मदत होणार आहे. देशातील हवाई उड्डाण कालावधीच्या आधारे विमान प्रवासाच्या भाड्याच्या कमी आणि उच्च मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही मर्यादा गेल्यावर्षी 25 मे रोजी लॉकडाऊन उघडण्याच्या वेळी निश्चित केली गेली होती.
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार, ४० मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे साधारण भाडे हे २,३०० रुपये इतके असते. मात्र आता त्यात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना ४० मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी २६०० खर्च करावे लागणार आहेत. तर ४० मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत विमान प्रवासासाठी प्रतिव्यक्ती २,९०० रुपयांऐवजी ३,३०० रुपये मोजावे लागतील.
गेल्यावर्षी मे महिन्यात नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी एकूण ७ फेअर बँडची घोषणा केली होती. हे ७ बँड प्रवासाच्या वेळेवर आधारित आहेत. यातील पहिला बँड ४० मिनिटांपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. तर उर्वरित बँड अनुक्रमे ४०-६० मिनिटे, ६०-९० मिनिटे, ९०-१२० मिनिटे, १२०-१५० मिनिटे, १५०-१८० मिनिटे आणि १८०-२१० मिनिटे प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आहेत. यात ६०-९० मिनिटे, ९०-१२० मिनिटे, १२०-१५० मिनिटे, १५०-१८० मिनिटे आणि १८०-२१० मिनिटे यांच्या तिकीटाचे दर अनुक्रमे ४०००, ४७००, ६१००, ७४०० आणि ८७०० रुपये इतके आहेत.