शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आज ‘कामबंद’ आंदोलन; २२ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. तर दुसरीकडे वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे. अशातच आता कोरोना संकटात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे. राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील डॉक्टर आज एकदिवसीय काम बंद आंदोलन करत आहेत. तसेच शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र २२ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
शायकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा आणि त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशा मागण्या डॉक्टरांच्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर्स आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. परंतु, शासनानं वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांचं आंदोलन मागे घेण्यास त्यांना भाग पाडलं. पण आज मागण्या मान्य नाही झाल्या तर 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी दिला आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोना संकटात एकाही दिवसाची सुट्टी न घेता, तसेच क्वॉरंटाईन लीव्ह न घेता हे सर्वजण 24 तास काम करत होते. तरिदेखील सर्व डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तरिदेखील प्रशासनाकडून यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या आहेत की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी करा, तसेच शासनाचा जो सातवा वेतन आयोग आहे, तो लागू करा. अशातच जर डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या तर शासनावर आर्थिक भार येईल, असं चित्र रंगवण्यात येत आहे. परंतु, असं काहीही होणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकराच लवकर आमच्या मागण्या मान्य करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे.
दरम्यान, राज्यभरातील डॉक्टरांनी आज 24 तासांचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मात्र 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.