दबावतंत्रासाठी सहकार खात्याचा वापर करू नका; संजय राऊतांचा भाजपला इशारा
नवी दिल्ली : राजकारणासाठी म्हणून सहकार क्षेत्र मोडू नये. जर कुणी असं ठरवलं असेल तर ते देशाच्या हिताचं नाही. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकात सहकार क्षेत्र मोठं आहे. मी असं ऐकलं आहे की नव्या सहकार मंत्र्यांनीही या क्षेत्रात काम केलं आहे. त्यामुळे ते या क्षेत्राचा वापर देशहितासाठीच करतील. पण फक्त राष्ट्रवादीचेच चार लोक आहेत म्हणून हे खातं निर्माण केलं असेल तर हे चुकीचं आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेले विखे-पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचे काही नेतेही या क्षेत्रात आहे. हे खातं दुरुस्तीसाठी असेल तर हरकत नाही. पण दबाव टाकण्यासाठी सहकार क्षेत्राचा वापर करू नका अशा शब्दात शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. दरम्यान, हा महाराष्ट्र आहे. इथं दबाव आणून काही होत नाही. हे काही ३० आमदारांचं राज्य नाही. जिथे कुठले विचार नाहीत अशा राज्यात दबावातून सत्तांतर होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात दबावातून सत्ताबदल होऊ शकत नाही, असा एकप्रकारे इशाराच राऊत यांनी भाजपला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणा चांगलंच ढवळून निघालं आहे. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर केंद्राकडून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचा वापर दबावतंत्र म्हणून केला जाईल, या शक्यतेवरुनही राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांवर लावलेले निर्बंध किती अडचणीचे ठरणार आहेत हे पवारांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. पवार आणि मोदी भेटीनंतर काही वेळातच संजय राऊत पवारांच्या भेटीला गेले होते. तिथून ते एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले. यावेळी पवारांनी मोदी आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसंच सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अडचणी मोदींसमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर नवं सहकार खातं ज्यांच्याकडे आहे, अशा अमित शाह यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, असं पवार म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं.