मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुख काही पळून गेलेले नाहीत. ते स्वत:हून ईडीसमोर हजर झाले. जे लोक देश सोडून पळून जातात त्यांना केंद्रीय सत्तेचं पाठबळ असतं. अनिल देशमुखांना झालेली अटक कायद्याला आणि नीतीमत्तेला धरुन नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोठे घोटाळे आणि आरोप असलेले व्यक्ती जेव्हा देश सोडून पळून जातात तेव्हा ते केंद्रीय सत्तेच्या मदतीनंच पळून जातात. परमबीर सिंग हे काही स्वत: पळून गेलेले नाहीत. त्यांना पळवून लावण्यात केंद्रीय सत्तेनं मदत केली आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याचा धंदा यांनी सुरू केला आहे. चिखलफेक करायची, बदनाम करायचं आणि डाव साधायचा असं घाणेरडं राजकारण भाजपकडून केलं जात आहे, असंही राऊत म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या अटकेसोबतच आज अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. मला आज कळालं की अजित पवारांच्याही मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. पण मला एक कळत नाही. भाजपचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका. काही लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असं म्हणतायत मी एक सांगतो दिवाळीनंतर आम्ही जर बॉम्ब फोडायचं ठरवलं तर यांना घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवावं लागेल. पण तसं आम्ही करणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
२०२४ नंतर भेटू, तुमच्याही फायली तयार आहेत !
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल विरोधकांना दिला होता. राऊत यांनी आज थेट २०२४ नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, असा सज्जड इशाराच दिला आहे.
कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. २०२४ नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.
कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. अटकासटका केल्या तरी सरकार पडणार नाही. महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल त्यांनी केला.
ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचं दाखवत आहेत ते सर्व राजकीय षडयंत्र आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे षडयंत्र रचलं गेलं आहे. मी सुद्धा हे भोगलं आहे. आमच्या कुटुंबाने भोगलं आहे. माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला. कुटुंबाला त्रास दिला गेला. ज्यांच्यामुळे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही त्या प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. जे लोकं भाजपच्या अमिषाला बळी पडत नाही, सरकार पाडण्यासाठी त्यांना त्रास दिला जात आहे. तुम्ही कितीही त्रास दिला आणि अटकासटका केल्या तरी तुमचं सरकार येणार नाही, असंही राऊत यांनी बजावलं.