राजकारण

डीएमके प्रमुख स्टॅलिन आज सकाळी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

चेन्नई : तामिळनाडू निवडणुकीतील विजयानंतर आता डीएमके प्रमुख स्टॅलिन आज सकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी राजभवन परिसरात सकाळी ९ वाजता होणार आहे. स्टॅलिन यांच्या सोबत अन्य ३३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी बुधवारी स्टॅलिन यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं. डीएमकेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या नेते पदी स्टॅलिन यांची नियुक्ती केल्यानंतर तशा आशयाचे एक पत्र राज्यपालांना पाठवलं होतं. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महासचिव दुराई मुरुगन यांच्यासोबत स्टॅलिन यांनी पुरोहित यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. महत्वाचं म्हणजे, २००६ ते २०११ या दरम्यान डीएमके पक्षाची ज्या वेळी सत्ता होती त्यावेळी करुनानिधी मुख्यमंत्री होते आणि स्टॅलिन त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता स्टॅलिन पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये डीएमकेने १३३ जागा जिंकल्या आहेत तर विरोधी असलेल्या एआयडीएमके पक्षाने ६६ जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत डीएमकेला ३२ जागांचा फायदा झाला असून डीएमकेच्या विजयात स्टॅलिन यांचा सिंहाचा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button